असे ही असते का ?
जीवनात आनंदी राहणे खूप गरजेचे असते. असं म्हणतात की आनंदी राहिल्याने आपण जास्त काळ जगतो. अनादी राहिल्याने, सतत हसतमुख राहिल्याने आयुष्य वाढतं हे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत.
व्यायाम, योग, प्राणायाम वगैरे अनेक गोष्टींमुळे शरीर सुदृढ राहते आणि माणूस दीर्घायुषी होतो असं अनेकवेळा सांगितलं जातं. त्यादृष्टीने अनेकजण प्रयत्न सुद्धा करताना दिसतात. मात्र तब्बल १०९ वर्षे जगलेल्या एका वृद्ध महिलेचे मत काहीसे निराळे आहे.
स्कॉटलंड येथील १०९ वर्षीय वृद्ध महिला जेसी गॅलन ह्यांचं प्रदीर्घ काळ जगण्याचं कारण जरा वेगळंच आहे. २०१५ साली वयाची १०९ वर्षे त्यांनी पूर्ण केली. अखेर त्याच वर्षी वृद्धापकाळाने त्यांचा मृत्यू झाला.
जेसी गॅलन ह्या स्कॉटलंडच्या सर्वात वृद्ध महिल्या होत्या. जेसी आता ह्या जगात नाहीत पण त्यांनी त्यांच्या मृत्यूआधी आपल्या एवढ्या मोठ्या आयुष्याबद्दल जे सांगितले ते खूप आश्चर्यकारक आणि विचित्र असे होते.
आपल्याला वाटतं की, जर मनुष्याने योग्य आहार, योग्य दिनचर्या, रोज व्यायाम इत्यादी सर्व केलं तर तो जास्त काळ जगू शकतो. पण जेसी ह्यांचं ह्याबाबत काही वेगळच म्हणणं आहे. जेसी ह्यांच्या मते जास्त आयुष्य आणि निरोगी जीवनासाठी पुरुषांपासून दूर राहावे.
जेसी ह्यांनी त्या १३ वर्षांच्या असतानाच घर सोडलं होतं. त्यानंतर त्यांनी जीवनात त्यांना जे हवं आहे ते मिळवलं. कठोर परिश्रम आणि आपल्या हिमतीच्या जोरावर त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या.
स्कॉटलंडच्या नर्सिंग होममध्ये जेव्हा त्याचं निधन झालं, तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितलं की त्या त्यांचे संपूर्ण जीवन हे आनंदात जागल्या. त्यांनी नेहमी “पुरुषांपासून दूर राहा आणि प्रदीर्घ आयुष्य जगा” आपला हा पवित्रा सोडला नाही.
त्यांच्या या विचारावर त्या नेहमीच ठाम होत्या. त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य तेच आहे असे त्यांचे म्हणणे होते.
प्रत्येकाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो, प्रत्येकाची जीवन जगण्याची पद्धत वेगळी असते. जेसी ह्यांनी त्यांच्या जीवनात तेच केलं जे त्यांना पटलं.
त्यांना कधीही त्यांच्या जीवनात कुठल्या पुरुषाची कमतरता भासली नाही. त्यांनी त्याच गोष्टींना महत्व दिलं ज्या त्यांच्यासाठी महत्वाच्या होत्या, ज्यातून त्यांना आनंद मिळायचा.
जगात असे अनेक लोक आहेत जे आपले संपूर्ण आयुष्य एकटे राहून काढतात. कदाचित त्यांना आपल्या आयुष्यात इतर कोणाचा हस्तक्षेप किंवा लुडबुड आवडत नसते. किंवा त्यांना जे करायचं आहे ते त्यांना स्वतःच्या भरवश्यावर आणि हिमतीवर करायचे असते.
म्हणूनच ते आयुष्यभर एकटे राहत असावेत. त्यांना त्यांच्या आयुष्यात जोडीदाराची गरज वाटत नाही.
आपण एकटे राहावे की कुणाच्या सोबत हे आपल्यावर अवलंबून आहे पण जेसी ह्यांच्या मते जर प्रदीर्घ आयुष्य जगायचे असेल तर पुरुषांपासून दूर राहावे.