भारतीय संस्कृतीमध्ये चंद्र आणि सूर्य कालगणना यास महत्व आहे त्याप्रमाणे ऋतू बदल आणि ऋतू आगमन यांना देखील महत्व आहे. फाल्गुन महिन्याच्या अखेरीस शिशिर ऋतू बदलून चैत्र महिना सुरू होतो आणि वसंत ऋतूचे आगमन होते, त्यावेळी वेगवेगळ्या भागात फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा होतो त्यास फाल्गुनोत्सव किंवा वसंतोत्सव म्हणतात. होळी देखील याच दिवशी साजरी केली जाते आणि महाराष्ट्रात पंचमीपर्यंत पाच दिवस हा उत्सव विविध सणांच्या रुपात साजरा केला जातो. ह्या उत्सवाला होलिकादहन किंवा शिमगा, हुताशनी महोत्सव, फाग, फागुन, दोलायात्रा,कामदहन अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत.
होळी हा सण फार प्राचीन आहे. प्रारंभी ह्या सणाचे नाव ‘होलाका’ असे होते आणि त्याचा उल्लेख जैमिनीच्या पूर्वमीमांसा सूत्रावरील शबरस्वामींच्या भाष्यामध्ये केला आहे आणि त्यावरून हा सण भारतातील पूर्वेकडील प्रांतात फार रूढ होता असे दिसते. काठकगृह्य यामध्ये ‘राका होलाके’ असे एक सूत्र असून त्या सूत्रावरील टीकाकाराने असा खुलासा केला आहे की होला हा स्त्रियांच्या सौभाग्याकरिता करावयाचा एक विशिष्ट विधि असून त्यांत राका म्हणजे पौर्णिमा ही देवता असते. वात्सायनाच्या कामसूत्रात निरनिराळ्या प्रांतांत प्रचलित असलेल्या वीस खेळांची वर्णने केली आहेत आणि त्या खेळांत होलका ह्या खेळाचा समावेश केला आहे आणि त्या खेळांत फाल्गुन पौर्णिमेला एखाद्या शिंगातून अथवा त्याच्या सारख्या साधनाने एकमेकांच्या अंगावर रंगित पाणी उडविण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. हेमाद्रीने उद्धृत केलेल्या बृहद्यमाच्या एका श्लोकांत होलिका पौर्णिमेला हुताशनी असे नांव दिले असून सांप्रत काळी देखील तेच नांव प्रचलित आहे.
लिंगपुराणात फाल्गुन पौर्णिमेला फाल्गुनिका असे म्हटले आहे, आणि तो दिवस बालिश चेष्टांनी परिपूर्ण असतो आणि त्यामुळे लोकांची भरभराट होते असे म्हटले आहे. वराहपुराणात ह्या पूर्णिमेला पटवासविलासिनी म्हणजे रंगित पुडीच्या खेळांनी युक्त असे विशेषण लावले आहे. भविष्योत्तर पुराणात फाल्गुनी पौर्णिमैच्या दिवशी हसावे आणि मौज करीत घराच्या बाहेर लाकडांचा ढीग करून तो पेटवावा, टाळ्या वाजवाव्या, अग्नीच्या सभोवती प्रदक्षिणा घालाव्या, गाणी गावीं, ग्राम्य भाषेतील अश्लील शब्द उच्चारावेत असे सांगितले आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे पौर्णिमान्त मासगणनेप्रमाणे चैत्र महिन्यांतील प्रतिपदेच्या दिवशी लोकांनी त्या होळींतील राखाडीला वंदन करावे, कामदेवाची पूजा करावी. जैमिनीच्या सूत्रात आणि काठक गुह्यांत ज्या अर्थी होलिकेचा निर्देश केला आहे त्या अर्थी तो सण इसवी सन पूर्व काही शतके तरी अस्तित्वात असावा असे ठरते. कामसूत्र आणि भविष्योत्तर पुराण ह्यांनी ह्या उत्सवाचा वसंताशी संबंध जोडला आहे आणि तो उत्सव पौर्णिमान्तगणनेप्रमाणे वर्षाच्या अखेरीला करण्यात येत असे म्हणून होळी ही हिवाळ्याचा आणि थंडीचा अंत आणि उद्धार आणि कामोद्दीपक वसंताचे आगमन सुचविते.
उत्तर भागात त्याचप्रमाणे बंगाल, ओडीसा, मणिपूर, तमिळनाडू, कर्नाटक, मणिपूर, पंजाब, गोवा इत्यादी भागात हा वसंतोत्सव अगदी उत्साहात साजरा केला जातो. बंगाल आणि ओडीसात यादिवशी डोलायात्रा निघते, तर दक्षिणेत कामोत्सव म्हणून याकडे बघितले जाते. मथुरेत साजरी होणारी होळी जगप्रसिद्ध आहे. मणिपूरमध्ये वसंत ऋतूच्या सुरवातीला याओसांग हा आपल्याकडील होळीसारखा सण असतो, पंजाबमध्ये शीख लोक रंग उधळून होला मोहल्ला साजरा करतात. देशात विविध भागात वेगवेगळ्या स्वरूपात आणि वेगवेगळ्या प्रथांच्या आधारे हा उत्सव साजरा करतात ..
सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा…